Dr. Prachee Sathe
8 min readJun 26, 2021

--

कोविड आणि अतिदक्षता विभाग - आयसीयू विभागाची अग्निपरीक्षा

जागतिक महामारीमुळे जगभरातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची तारंबळ उडाली.केवळ तेवढेच नाही तर महामारी म्हणजे खरोखरच एक प्रकारे अग्निपरीक्षा आहे. तसं पाहायला गेलं तर एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 5 टक्के लोकांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता होती,मात्र संक्रमित लोकांचीच संख्या इतकी प्रचंड होती की,त्याचे 5 टक्के जगाच्या विकसित देशांमध्ये सुध्दा अतिदक्षता विभागात उपलब्ध असलेल्या खाटांच्या कित्येक पट जास्त होते. आपल्याकडे संपूर्ण जीडीपीच्या मानाने एक टक्का देखील आपण आरोग्यव्यवस्थेवर खर्च करत नाही. अशा वेळेला संपूर्ण आरोग्यव्यवस्थेला कुठल्याही अशा अस्मानी संकटाशी सामना करणे एक मोठे आव्हान होते. पण तरीही आपल्या स्वास्थ कर्मचाऱ्यांनी दवाखाने,डॉक्टर्स,परिचारिका,सपोर्ट स्टाफ,ऍडमिन स्टाफ,लॅब सर्वानीच अफाट काम केलं. त्यातल्या त्यात आयसीयू स्टाफवर तर याचा प्रचंड ताण आला होता.

Article by Dr. Prachee Sathe in Maharashtra Times
Article by Dr. Prachee Sathe in Maharashtra Times

अतिदक्षता विभागातील खाट म्हणजे अनेक अत्यावश्यक साधनांचा मिलाफ असतोे. आवश्यक असणारी मॉनिटरींग यंत्रसामुग्री,ऑक्सिजन,औषधे, व्हेंटिलेटर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनुष्यबळ ज्यामध्ये डॉक्टर्स,नर्सेस व सहाय्यक कर्मचारी असतात,जे रूग्णांना योग्य पध्दतीने देखभाल करू शकतात. महामारीमुळे संपूर्ण जगाच्या डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन पडलं की,योग्य पध्दतीने प्रशिक्षित केलेल्या डॉक्टर्स व नर्सेसचे महत्त्व किती जास्त आहे हे समजले. योग्य पध्दतीने म्हणजे त्यांच्या कौशल्यामध्ये ते वादातीत /निपुण असले पाहिजेत,कुठलीही गंभीर परिस्थिती किंवा अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीला हाताळण्यासाठीचे ज्ञान व अनुभव असायला हवा,त्याचबरोबरीने त्यांच्यामध्ये अशी मानसिकता हवी की माणुसकीच्या नात्याने यासारख्या परिस्थितीला कसे हाताळता येईल. असा डॉक्टर तयार करण्यासाठी काही वर्ष लागतात.

कठीण काळात विविध स्तरांच्या अतिदक्षता विभागाची बांधणी

संपूर्ण जगामध्ये अतिदक्षता विभागामध्ये काम करणार्‍या डॉक्टर्स,नर्सेसने आपल्या कामाकाजाची परिसीमा ओलांडून उल्लेखनीय काम केले आहे. अतिदक्षता विभागात कर्मचार्‍यांची संख्या पुरेशी नव्हती,त्यामुळेही इतर डॉक्टर्सला आपल्याला अतिदक्षता विभागातील कामात समाविष्ट करावे लागले.त्यांना प्रशिक्षण देणे,हा एक भाग होता.म्हणजेच ज्यांना अतिदक्षता विभागाचा अनुभव नाही,फारशी माहिती नाही,कौशल्य नाही,त्यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणे यासाठी जागतिक व राष्ट्रीय स्तरावर खूप मोठं काम केलं गेलं. कोविड काळात नावीन्यपूर्ण पध्दतीने ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेणे किंवा आयसीयूच्या माध्यमातून सहकार्य करणे तसेच तंत्रज्ञानामध्ये सुधारित बदल करून योग्य पध्दतीने वापर केला गेला. अशा पध्दतीने डॉक्टर्स,नर्सेससह प्रत्येक रूग्णालयाचे प्रशासन ही यांत महत्त्वाचे होते. कारण हे निर्णय घेणे,ते अंमलात आणणे यामध्ये रूग्णालय प्रशासनाचा मोठा वाटा होता. प्रत्येक स्तरावर वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत होते,ज्यामध्ये कोविडचे बेडस वाढविणे,कोविडच्या आयसीयू बेडस वाढविणे हे सर्व निर्णय घेण्यात येत होते. जेव्हा अधिकधिक बेडसची आवश्यकता लागली तेव्हा नवीन आयसीयू कार्यान्वित देखील केल्या गेल्या.या आयसीयू कदाचित आपल्या प्रमाणित आयसीयूइतक्या उत्तम दर्जाच्या नसतील,पण त्यावेळी ती वेळेची गरज होती.अशा वेळी समर्पित केंद्र निर्माण झाले,तिथे आयसीयूमध्ये काम करणार्‍या लोकांचे गट निर्माण केले गेले आणि त्यांना कामे करायला दिली गेली.या प्रकारच्या केंद्रांच्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.कारण गरजेसाठी उभे राहणे आणि खरोखरच त्यातील मूलभूत ज्ञान,कौशल्य असणे गरजेचे आहे.कदाचित याचा फायदा असा होईल की,धोरणकर्ते,सरकारी डॉक्टर्स,सरकारी प्रशासक,खासगी क्षेत्र या सर्वांनाच अतिदक्षता विभागाची गरज लक्षात येईल.

Fight against Covid-19, painting by Uma Maharana, Bhubaneshwar, Odisha
Fight against Covid-19, painting by Uma Maharana, Bhubaneshwar, Odisha — part of the project “Art in the time of Corona” by Indiaart and Khula Aasmaan (खुला आसमान)

सर्व अतिदक्षता विभाग सारखे नसतात.अतिदक्षता विभागामध्ये प्राथमिक,मध्यम आणि प्रगत असे स्तर असतात. ग्रामीण,जिल्हा रूग्णालय,तालुका रूग्णालय,मोठी शासकीय रूग्णालये,मोठी कॉर्पोरेट रूग्णालये या सर्व ठिकाणी अतिदक्षता विभागाची आवश्यकता असते.कारण अतिदक्षता विभागाची गरज पडणारा रूग्ण हा अस्थिर असतो,त्यामुळे त्याला स्थिर करणे व गरजेप्रमाणे योग्य त्या अतिदक्षता विभागात पाठवणे ही पण एक महत्वाची गोष्ट असते.या तीनही स्तरांवरच्या अतिदक्षता विभागांचा एकमेकांशी संबंध असला पाहिजे. ज्या रूग्णाला प्रगत अतिदक्षता विभागाची गरज संपून सुधारणा झाल्यामुळे ,त्याला परत प्राथमिक स्तरावरील अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे आहे. ही सर्व प्रक्रिया कोविड काळात कशी झाली ते पाहणं महत्वाचं आहे. काही रूग्णांना केवळ ऑक्सिजन हवा होता,मात्र जो आजार असतो,तो कसा वाढेल,रूग्ण कधी बरा होईल हे पहिल्या दिवशी कळत नाही.प्रत्येक व्यक्तीचे शरीर,त्याला झालेले संक्रमण हे वेगळे असते. त्यामुळे सतत दिवसागणिक त्यांच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. या सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरील अतिदक्षता विभागांची निर्मिती झाली आणि त्यांचा एकमेकांशी सुसंवाद असणे हे या साथीच्या काळात सर्वाना जाणवले. रुग्णाच्या जोखमीप्रमाणे त्यांची अशा विभागात अंतर्गत हलवाहलवी केल्यामुळे जास्तीत जास्त आयसीयू खाटा उपलब्ध करून देता आल्या.इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन ने याची मार्गदर्शक तत्वे ठरवली आहेत. प्रत्येक दर्जाच्या आयसीयूला साधारण कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे,ज्यात यंत्रसामग्री,नर्सेस,कर्मचारी वर्ग याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली गेली आहेत.कोविडच्या दृष्टीने देखील ती अंमलात आणावी लागतील.

अतिदक्षता विभागातील संसर्ग नियंत्रण

अतिदक्षता विभाग चालविताना संसर्ग नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे गंभीररित्या आजारी असणार्‍या रूग्णांना आणखी नवे संसर्ग होऊ नयेत आणि त्यांना झालेला संसर्ग अतिदक्षता विभागातील इतर डॉक्टरांमध्ये किंवा इतर रूग्णांमध्ये पसरू नयेत या सगळ्याची काळजी घ्यावी लागते. स्वच्छता म्हणजे केवळ डोळ्यांना दिसणारी स्वच्छता नव्हे,तर जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून दर दोन तासांनी केलेली सखोल साफसफाई, जमीन पुसण्यापासून ते सगळ्या यंत्रसामग्रीचा जंतूनाशक वापरून पृष्ठभाग स्वच्छ करणे,सतत हात धुणे या गोष्टी गरजेच्या आहेत.याबरोबरच रूग्णांचा श्‍वासोच्छवासाच्या नलिकेतून कफ काढणे,सलाईनमधून इंजेक्शन्स देणे,रूग्णाची स्वच्छता ही सर्व रूग्णांना हाताळण्याच्या विविध तंत्रांचे प्रशिक्षण संसर्ग नियंत्रणाद्वारे दिले जाते.पण कोविड काळात या सर्व गोष्टी फार जास्त प्रमाणात कराव्या लागल्या.डॉक्टर्स,नर्सेस,तंत्रज्ञ,एक्स रे टेक्निशियन्स,लॅब पर्सोनेल,अन्य कर्मचारी यांना स्वत:चे संरक्षण करून रूग्णाला सांभाळायचे होते.सुरूवातीच्या काळात गुदमरणारे पीपीई कीट घालून उपचार करण्यात आले,अशा काळातही अनेकांना कोविड झाला.अनेक डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तर जीव गमावले.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या संवेदना समजून घेतांना

एक रूग्ण जेव्हा अतिदक्षता विभागात येतो,म्हणजे तेव्हा फक्त तो रूग्ण एकटा नसतो,त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीय,स्नेही,त्याच्याबरोबरीच्या आणखी इतर समस्या येतात.या इतर समस्या केवळ वैद्यकीय नसतात तर अन्य समस्यासुद्धा असतात,ते सगळं इथे फार मोठं रूप घेऊन उभे राहतात. जेव्हा रूग्ण अतिदक्षता विभागात जातो,तेव्हा असं म्हणतात की,काचेचा दरवाजा एकदा बंद झाला की,त्याचा बाकीच्या जगाशी,कुटुंबाशी संबंध तुटतो.काही कारणाांसाठी जवळच्या लोकांना रूग्णाजवळ थांबू देत नाही. तरीही आम्ही बरेचदा रूग्ण लवकर बरा होण्याच्या दृष्टीने त्याचा इतरांशी संपर्क राहील,याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो,कारण त्याचे सकारात्मक परिणामही जास्त असतात. पण कोविडच्या काळात मात्र ही अतिशय अवघड गोष्ट होती,कारण जितके कमीत कमी लोक रूग्णाच्या सहवासात येतील तितके बरे होते. महामारीला आळा घालण्याच्या दृष्टीने बरेेच होते. म्हणूनच रूग्णाच्या नातेवाईकांना आम्ही जाऊ देऊ देत नव्हतो,त्याचा मानसिक ताण रूग्ण,नातेवाईक आणि आयसीयूमध्ये काम करणार्‍या लोकांवर ही येत होता. अशा तणावपूर्ण वातावरणात आपल्या रूग्णाला अशा परिस्थितीत पाहून संवेदनशील नातेवाईकांशी संपर्क साधणे हे देखील एक आव्हान होते.

Dos and Don’ts about Covid-19, painting by Radhika Argade (class 12)
Dos and Don’ts about Covid-19, painting by Radhika Argade (class 12) — part of the project “Art in the time of Corona” by Indiaart and Khula Aasmaan (खुला आसमान)

ज्युनिअर डॉक्टरांमधील तरुण नेतृत्व

ज्युनिअर डॉक्टरांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक होता.आपल्या प्रशिक्षण,कौशल्याचा भाग सोडून सर्वांनी कोविडसाठीच काम केले.सुरूवातीच्या काळात याची गरज होतीच,मात्र गेले दीड वर्ष हे वाढलेले आहे,रेंगाळलेले आहे,या तरूण डॉक्टरांनी आपल्या करिअरमध्ये स्वत:ची कौशल्ये विकसित न करता कोविड रूग्णसेवा केली आहे. ज्युनिअर डॉक्टर्सना याशिवाय काही पर्यायच नव्हता. ते कचाट्यातच सापडले होते. या सर्वांना कोविडच्या काळात सुरूवातीला काम करून घरी जाण्याचे दडपण होते. कारण घरी वयस्कर लोक होते. मनुष्यबळ कमी असल्याने हवा तेवढा क्वारंटाईन वेळ मिळायला हवा तेवढा त्यांना मिळत नव्हता,बिना क्वारंटाईनची देखील त्यांनी सेवा केली आहे. शहरा-राज्याबाहेर राहणारे हे सर्व लोक निरंतर काम करत होते. यामुळे एक गोष्ट अशी घडली की,आमचं एक मोठं कुटुंब बनले. त्यांच्यातील नेतृत्वगुण बाहेर पडले. हे काम या तरूण डॉक्टरांच्या पुढील आयुष्याला उभारी देणारे नक्कीच ठरेल.

Angels in Disguise, painting in oil pastels by Farhana Momin, Bangalore
Angels in Disguise, painting in oil pastels by Farhana Momin, Bangalore — part of the project “Art in the time of Corona” by Indiaart and Khula Aasmaan (खुला आसमान)

तिसरी लाट नकोच

पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक लोकांनी आपल्या आवडत्या व्यक्ती,कुटुंबीय,मित्र मंडळी महामारीमुळे गमावले,तेव्हा सर्वांनाच या मोठ्या आव्हानाची जाणीव व्हायला लागली.लोक कसे वागतात,किती काळजी घेतात,यावर तिसरी लाट अवलंबून आहे.आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे,केवळ शासनाला दोष देऊन काही होणार नाही.लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.अतिदक्षता विभागाचा योग्य वापर करून घ्यायचा असेल तर,समाजाने या उपलब्ध सुविधेचा पूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. पण लाट आलीच तर पुन्हा पुन्हा अडचणींची पुनरावृत्ती नको. म्हणून सरकारी पातळीवर सुद्धा प्रयत्न हवेतच.

Stay Home, Stay Safe, painting in oil pastels by R. Rishab (11 years)
Stay Home, Stay Safe, painting in oil pastels by R. Rishab (11 years) — part of the project Art in Lockdown to fight coronavirus pandemic by Indiaart and Khula Aasmaan (खुला आसमान)

व्हेंटिलेटरची भीती नको

व्हेंटिलेटर म्हटलं की सर्वसामान्यांचा मनात भीतीच निर्माण होते. उपचारादरम्यान सर्व प्रयत्न संपले म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला,कुटुंबीयांना,स्नेहींना व्हेंटिलेटर लावले आहे असे अतिदक्षता विभागाच्या बाहेर काळजीत पडलेल्या सर्वांचा समज असतो. त्यामुळे आपला माणूस कदाचित आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे की काय आणि आता यातून बाहेर निघणे अवघड आहे,असे देखील बर्‍याच जणांना वाटते.सध्या कोविड -19 ने जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आणि या काळात व्हेंटिलेटर हे आरोग्यसेवेच्या केंदस्थानी आलेे. विशेष करून नकोसे वाटणारे व्हेंटिलेटर हे वैद्यकीय उपकरण आता काळाची गरज,रुग्णांसाठी वरदान,विश्वासू साथी आणि सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.कोरोना व्हायरस ने सर्व जगाला ग्रासलेले असतांना, व्हेंटिलेटरचा वापर ही असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे.

व्हेंटिलेटर म्हणजे काय ?

व्हेंटिलेटर हे रक्ताच्या प्रवाहात पुरेसा प्राणवायू उपलब्ध करणे आणि कार्बनडायऑकसाईड बाहेर काढणे अशी दोन महत्त्वाची कार्ये करते. ह्यामुळे नाजूक परिस्थितीत व श्वसन प्रक्रिया स्वतः पूर्णपणे करू न शकणार्‍या रुग्णाला मदत होते. ह्या उपकरणामुळे श्वसनाचा त्रास असणार्‍या रुग्णाला योग्य प्रमाणात प्राणवायू दिला जाऊ शकतो आणि श्वसन प्रक्रियेला लागणारे अतिरिक्त प्रयत्न कमी झाल्याने रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. जेव्हा एखादे मानवी शरीर तीव्र किंवा गंभीर रोगाने ग्रासलेले असते तेव्हा,हृदय आणि फुफुसांना जास्तीत जास्त सहाय्याची गरज असते.अश्या वेळेस शारीरिक प्रक्रिया या खूप गुंतागुंतीच्या,अत्यंत काटेकोरपणे नियंत्रित असतात. अश्या वेळेस व्हेंटिलेटर उपयुक्त ठरते. खरंतर व्हेंटिलेटरचे सहाय्य घेतलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75–85% बरे होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतात.कोविड रूग्ण आयसीयूमध्ये दाखल झाला की तर तो 15 ते 30 दिवस आयसीयूमध्ये राहयचा. कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही लंग फायब्रोसिसचा त्याला त्रास व्हायचा.त्यामुळे कोविड-नॉन कोविड आयसीयू सारखे पर्याय होते.आयसीयूमध्ये काळजी घेतो त्याचा दर्जा जितका महत्त्वाचा आहे,तितकाच रूग्णाचा प्रतिसादही महत्वाचा आहे.एकीकडे एकाच रूग्णाकडून दीर्घकाळ वापरली जाणारी खाट आणि दुसरीकडे अतिदक्षता विभागात उपचाराची गरज असलेल्या गंभीर रूग्णांची प्रतीक्षा याचा विचार करून जगभरात नवनवीन तंत्र व पध्दती समोर आल्या.

आयसीयू मध्ये नवीन तंत्रांचा प्रभावी वापर

कोविडचा मुख्य आघात फुफ्फुसांवर होता.बाकीच्या अवयवांवरही परिणाम होत असे पण मुख्यत: फुफ्फुसांवर. सायटोकाइनमध्ये ज्या पध्दतीने फुप्फुसे निकामी व्हायची त्यामध्ये बाहेरून कितीही ऑक्सिजन दिला तरी शरीरातील रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचणार नाही,अशी भीती असायची आणि ते सतत आम्हाला डोळ्यात तेल घालून पाहावे लागायचे. ऑक्सिजनेशन वाढविण्यासाठी जे काही नवीन तंत्रज्ञान ज्याला हाय फ्लो नेझल ऑक्सिजन किंवा बायपॅप नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटीलेशन म्हणतात. म्हणजे श्‍वास नलिकेमध्ये नळी न घालता त्यापूर्वीच वेगवेगळ्या पध्दतीने फुफ्फुसाला अधिक प्राणवायूचा जास्त परिणामकारक पुरवठा करणे.

Tree of Hope, painting by Sumdima Rai, Mumbai
Tree of Hope, painting by Sumdima Rai, Mumbai — part of the project Art in Lockdown to fight coronavirus pandemic by Indiaart and Khula Aasmaan (खुला आसमान)

आपण जेव्हा उभे असतो तेव्हा संपूर्ण शरीराच्या सर्व अवयवांवर गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव असतो,त्यामुळे फुफ्फुस ही हवा भरलेल्या पिशव्यांची एक गठरी आहे किंवा एकावर एक ठेवलेल्या वायुकोषांची चळत असते.त्यावरही गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव असतो.त्यामुळे खालचे काही वायुकोष हे पूर्णपणे मिटून जातात व निष्क्रिय परिस्थितीत असतात,अशा वेळेला फुफ्फुसाची स्थिती,गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव बदलून जास्तीत जास्त वायुकोष ऑक्सिजनेशनमध्ये,प्राणवायू-कार्बनडायऑक्साईडच्या देवघेवीमध्ये भाग कसा घेतील हे बघण्यासाठी रूग्णाला पोटावर पालथे झोपवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट होती,आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनमध्ये अतिशय चांगला परिणाम झालेला जाणवत होता.जगभरामध्ये प्रोन पोझिशन व्हेंटीलेशन वापरले गेले.हळूहळू त्याचा प्रसार फक्त अतिदक्षता विभागात नाही तर होम आयसोलेशन किंवा घरात विलगीकरण असलेल्या रूग्णांना देखील असा सल्ला दिला गेला .जर त्यांना थोडाफार श्‍वासोच्छवासाला त्रास होत असेल तर त्यांनी घरीसुध्दा पोटावर पालथे झोपावे,त्यामुळे फुफ्फुसाचे साधारण कामामध्ये नसणारे इतर काही भाग वायुंच्या देवघेवीमध्ये भाग घ्यायला लागतील.हाय फ्लो नेझल ऑक्सिजन या प्रणालीमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन नाकाद्वारे दिला जायचा.जेव्हा बायपॅप सारख्या यंत्राद्वारे खूप जास्त दाबाने ऑक्सिजन दिला जातो,तेव्हा आतमध्ये आपली फुफ्फुसे,श्‍वासनलिका,श्‍वासमार्ग कोरडा व्हायला लागतो आणि ते सहन होत नाही. हाय फ्लो नेझल ऑक्सिजन थेरपीमध्ये हाच प्राणवायू पूर्णपणे बाष्पाने भरलेला असतो,त्यामुळे आपण नेहमीसारखे श्‍वास घेताना जसा प्राणवायू कोरडा नसून बाष्पयुक्त असतो आणि त्यामुळे आतमध्ये खूपच सुलभ,आरामदायी परिस्थिती निर्माण होते.या पुष्कळशा नवनवीन पध्दतींना,शास्त्रीय दृष्टीकोनातून सुध्दा याला दुजोरा मिळत गेला आणि जगभरात जास्तीत जास्त प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या.घरच्या घरी ऑक्सिजन देता येईल अशा पध्दतीने पण काही अभिनव प्रयोग केले गेले.हवेमध्ये 20 टक्के ऑक्सिजन असतो,जर आपल्याला सिलेंडरमध्ये भरलेला ऑक्सिजन मिळत नसेल तर हा हवेतील ऑक्सिजनच आणखी काही प्रमाणामध्ये संपृक्त करून कसा वापरता येईल,अशा विचाराने काही यंत्रे अस्तित्वात आहेत,त्यावर अधिक संशोधन केले गेले,याला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर म्हणतात.म्हणजे हवेतीलच ऑक्सिजन घेऊन त्यातील नायट्रोजन काढून टाकला तर ऑक्सिजन जवळजवळ 90 टक्के प्रमाणामध्ये संग्रहित करता येतो आणि तो रूग्णाला घरच्या घरी सुध्दा देता येऊ शकतो. याचा फायदा बऱ्याच अंशी प्रगतीपथावर असणाऱ्या रुग्णांना डिसचार्ज देऊन,गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध करून देण्यामध्ये झाला .

थोडक्यात म्हणायचे तर अतिदक्षता विभागांनी कोव्हिडमध्ये जीव वाचवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा. पहिली लाट आणि दुसरी लाट यामध्ये अतिदक्षता विभागातले मृत्युदर घटले. याचा अर्थ उपचारांमध्ये सुसूत्रता जास्त आली. अतिदक्षता विभागावर ताण किती होता हेही महत्वाचे होते. भविष्यकाळात स्वास्थ्यकर्मींना गंभीर रुग्ण हाताळण्यासाठी मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण तसेच तसेच उपकरणांनी अद्ययावत असे अतिदक्षता विभाग उभे करणे ही काळाची गरज सर्वांनीच ओळखणे गरजेचे आहे.

डॉ . प्राची साठे

अतिदक्षता विभाग प्रमुख

रुबी हॉल क्लिनिक

--

--

Dr. Prachee Sathe

Intensivist, Physician. Interested in critical care, medical education, patient education and health policy.